*गडचिरोली-चामोर्शी मार्गावर भयानक अपघात; 5 मृत, ६ गंभीर जखमी

गडचिरोली, दि. 29 : हसत-खेळत, लग्नाचा आनंद साजरा करून परतणारी वरात… गाण्यांच्या तालावर सुरु असलेला प्रवास… आणि क्षणात सर्व काही काळाच्या पडद्याआड. गडचिरोली-चामोर्शी मार्गावर रविवार 29 मार्च रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने आनंदाचा हा प्रवास शोकसभेत बदलला. ट्रॅव्हल्स बस आणि स्कॉर्पिओ यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू, तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरुड-कढोली गावादरम्यान नाल्याजवळील धोकादायक वळणावर सायंकाळी सुमारे 6.45 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. एमएच 46 पी 5392 क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधून एकूण 16 प्रवासी रामपूर येथील लग्न समारंभ आटोपून भाडभीडी मोकासा येथे परतत होते. त्याचवेळी गडचिरोलीहून चामोर्शीकडे जात असलेल्या एमएच 15 सीके 5005 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स बसशी त्यांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. काही प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमींना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारासाठी नेत असताना वाटेतच आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित जखमींवर उपचार सुरु असून काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
या हृदयद्रावक घटनेमुळे लग्नाच्या आनंदावर दुःखाचे सावट दाटले असून परिसरात शोककळा पसरली आहे.





